Friday, March 23, 2018

अशाश्वत

फास्ट झालंय आयुष्य आणि स्टॅमिना कमी पडतोय मनाचा
भावनांनाही वेळ नाही विचार करण्या कुणाचा.

मनाच्या meat मध्ये हल्ली भावना मॅरिनेट होत नाहीत!
कारण वेळाची इन्व्हेस्टमेंट, commitment करू देत नाही.

वरवरच्या मसाल्याने अंतरंगात मात्र चव जाणवत नाहीये
वरून लावलेला चमचमीत मुलामा रिलेशनशिपमध्ये घुसू पाहत नाहीये

म्हणून कुठेतरी सुंदर सुंदर selfies मध्ये केमिस्ट्री शोधतोय
सायकॉलॉजी बोलत नाही त्या स्पार्कला धरूं बघतोय.

स्पार्क येण्यासाठी सुद्धा दोन तारांना जुळावं लागत
क्षणभर धक्याचं का होईना दुःख सहन करावं लागत

पण दुःख म्हटलं की हल्ली दुरूनच टाटा बाय-बाय केला जातो
सतत हसायचेच दात दाखवण्याचा ग्लोबल ट्रेण्डच जपला जातो

तेच हसरे दात मग मनात सलणाऱ्या दुःखांचे ओठ खातात
आणि मन कितीही दमलं तरी गडी आयुष्याच्या रेसमध्ये पळत राहतात..

शाल्मली पेठे

Thursday, December 14, 2017

Convenient प्रेम

आजच्या काळात वाटत
मीरेचं प्रेम किती convenient होतं!
कारण तिचा कृष्ण कधी तिच्या जवळ नव्हताच!
ना तो तिला कुठल्या गोष्टीवरून मुर्खात काढायचा
ना तो तिला कधी फिरायला जाऊ सांगून उशिरा यायचा
तिने कितीही वेळा आय लव यु म्हटलं तरी त्याच्याकडून उत्तर येण्याची अपेक्षाच नव्हती.
मीरेचं प्रेम म्हणजे भातुकलीचा खेळ होता,
तीच प्रियकर आणि तीच प्रेयसी
भावल्याच्या मनात ती म्हणेल तेच भाव आणि भावली त्यातच खुश!
ना मतभेद ना रुसवे-फुगवे!
तीच स्वतःला कवटाळत असेल आणि घेत असेल कृष्ण प्रेमाचा आस्वाद

आजच्या काळात खरंच असं वाटतं ki मीरेचं प्रेम खूप practical होतं
ना तो तिला अडवू शकत होता
ना  ती त्याला  अडवू देणार होती
ना तिला त्याच्याकडून काही अपेक्षा होत्या
ना तिच्या अपेक्षांनी त्याला काही फरक पडणार होता
ती तिची तीच प्रेमात होती आणि कदाचित म्हणूनच प्रेम अजरामर झालं
मीरेला कधीच रुक्मिणी सारखा, 'जेवणात कृष्णाला काय आवडेल?' हा प्रश्न सोडवायचा नव्हता
ती बनवेल तीच पूर्वदिशा!
मीरेला कधीच राधेसारखा कृष्णाला सोडून जाण्याचा विरह सहन करायला लागणार नव्हता
कारण तो बॅक ऑफ द माइंडच होता की! ऑलवेज!

म्हणून आजच्या काळात खरंच असं वाटतं की मिरे सारख प्रेम करता यावं
कारण कुणालाच नकोय एक्सपेक्टेशन्स किंवा कॉम्प्लिकेशन्सच ओझं
प्रत्येकाला हवी आहे आपापली स्पेस
इथे कॉम्प्रोमाईज आणि sacrifice ला थाराच नाही.
त्यातून एक्सपेक्टेशन्स निर्माण झाल्याच तर तो त्याचा त्याचा प्रॉब्लेम!
दुसरा मग मूर्तीतला कृष्ण  बनून गप्प बसू शकतो.
प्रश्नही तुमचेच, उत्तरही तुमचीच!
भावना ही तुमच्याच
आणि हार्ट ब्रेक ही तुमचाच!
नावापुरता फक्त एक कृष्ण हवा असतो हल्ली, नाहीतर नावापुरती मीरा!
बाकी सगळं कसं इंडिव्हिज्युअलिस्टिक हवं.
हिशोब करा आणि वाट धरा !
म्हणून आजच्या काळात मिरे सारखे प्रेम करता यावं
झंझटच नको, काय?

Wednesday, June 7, 2017

तू येत आहेस का?

पावसा सारखा सरसर येतोस
आणि माझी होते तारांबळ..
टिपता टिपता ते चार क्षण
मनात उडतो पार गोंधळ

कधी येतोस कधी जातोस
तुझ तुला ठावूक
भावनांचा मदारी तू,
मी श्वान तुझे भावूक..

देउन जातोस ओलावा
पण मी आसूसते उबेला
तू गेल्यावर कुडकुडत बसते
मना शेजारी , कडेला.

कितीही उपरा ये,
पण येत जा अधून मधून
मनाच्या दाराला मी
तितकच घेते पुसून

जातानाही म्हण "येतो"
तितकाच भाबडा दिलासा
पुन्हा तुझी वाट पाहण्याचा
माझा अल्लड खुलासा..

शाल्मली.

Friday, October 28, 2016

दिवाळी

लहानपणापसूनच फटाक्यांचं विशेष अप्रुप नव्हतं.. ना मला, ना शलाकाला. आनंद साजरा करण्यासाठी काहितरी फोडायचं, आग लावायची, धुर काढायचा, मोठ्ठा आवाज करायचा हे आमच्या बुद्धिजीवी कुटुंबाला मुळातच आवडण्या पलिकडे होतं. तरिही इतरांचं बघून आम्हिही बाबाकडे फटाके आणण्यासाठी हट्ट करत असू, आणि बाबाही तो हौसेने पुरवायचा. तरिही फुलबाज्या, अनार, भुईनळी, असे शोभेचे, विशेष आवाज न करणारे फटाकेच आम्हाला पसंत होते. सुतळी बॉंब, लक्ष्मी बॉंब, रॉकेटं हे सगळं मी स्वानंदाने आणलेलं कधी आठवत नाही. मग पुढे क्राय च्या उपक्रमाद्वारे घरी आलेल्या पुस्तकात बाल मजुरांकडून कसे फटाके बनवून घेतात आणि त्यामुळे कित्येक बालमित्रांना आपले हात, पाय, डोळे आणि वेळीच जीवही गमवावा लागतो हे मी वाचलं आणि फटाके विकत घेणं कायमचं सोडून दिलं. त्यामुळे मुळातच सगळ्या मुलांना दिवाळी म्हणजे फटाके हे जे काही समिकरण वाटायचं, ते आमच्याकडे कधी बसलच नाही.
दोन्हिही मुली असून मुळातच नटण्या मुरडण्याची हौस नव्हती. दिवाळीचा नवा ड्रेस घ्यायचा, तो ही आईच्या आग्रहाखातर, त्यावर दागीने वगैरे असं काहीच घ्यायच नाही, कारण गरजच वाटत नसे! घेतला तर एखादा मॅचिंग हेअर बॅंड, म्हणजे झाली खरेदी पुर्ण! पण ती माझ्या बहिणीची,
माझी दिवाळी म्हणजे दिवाळी अंक! दिवाळी जवळ आली की माझी खटपट सुरू व्हायची. शाळेतून येता जाता वर्तमानपत्रांच्या स्टॉलवर दिवाळीअंक येऊ लागले आहेत का? यांच्याकडे बारीक लक्ष ठेवलं जायचं, आणि मग ज्या दिवशी पहिला अंक दिसेल त्या दिवशी बाबापाठी माझी भुणभुण सुरू! मग बाबा म्हणायचा थांब थोड्यावेळ सगळे आले की एकत्रच घेऊन येऊ. मग काही दिवसातच माझी आणि बाबाची वरात मॅजेस्टीक बुकडेपो कडे निघायची, आईने “४ च अंक आण” असं दटावलेलं असायचं, पण दुकानात शिरताच मी आणि बाबा दोघही हे शब्द विसरायचो. पुस्तकांच्या डोंगरात फतकल मारून तासन तास अंक चाळून आणखीन एक, आणखीन एक असं करत ७-८ वेगवेगळे अंक, ४-५ आवडत्या लेखकांची पुस्तकं जमायची. त्यातच बाबाच्याही आवडिच्या काही पुस्तकांची भर पडायची. मग तो भला मोठ्ठा अंकांचा गठ्ठा पाहून काउंटर वरचे काका हसायचे आणि त्यावर छोटासा डिस्काउंटही द्यायचे. अशी आमची “हॅप्पी दिवाली” घेऊन मी आणि बाबा घरी यायला निघालो की आई हा पुस्तकांचा डोंगर बघून आमची चांगलीच हजेरी घेणार याची जाणीव व्हायची. मग गपचूप ’तेरी भी चूप मेरी भी चूप’ म्हणत मी आणि बाबा काही खर्चच केला नाहिये असा अविर्भाव आणत असू. आणि तरीही घरी आल्यानंतर “वेड लागलय का तुम्हा दोघांना?” हे आईच ठरलेलं वाक्य ऐकावच लागायच!
परिस्थिती खाऊन पिऊन चांगली, पण श्रिमंतिची नव्हती, हातराखून खर्च करत सगळं मिळत होतं, पण सढळ हात सतत सोडण्याईतकी लक्ष्मी नांदत नव्हती,  पण म्हणून बाबाने कुठल्याच पुस्तकाला कधी नाही म्हटलं नाही. मग ते दर सुट्टितील प्रवासात व्हिलरच्या बुकस्टॉलवरून घेतलेलं ’चाचा चौधरी’ कॉमिक्स असो, अथवा पुस्तक जत्रेत आधी बुक करून घरी आणलेले एनसायक्लोपिडीयाचे भाग असोत, पुस्तकाला कधी नाही म्हणायच नाही हा जणू काही अलिखीत नियमच!

वेळी तहानभूक हरपून तासंतास वाचलेली पुस्तकं. पुस्तकांच्या दुकानात जाताना पोटात खरोखर जाणवणारी एक वेगळ्याच प्रकारची भूक, आणि आणलेली नवी कोरी पुस्तकं आईला दाखवताना होणार आनंद, अविस्मरणियच.. पुढे लहान वयातच गाण्याच्या रेकॉर्डिंगचे, कार्यक्रमांचे, शूटचे पैसे आले की त्यातून फक्त पुस्तकच घेत गेले. हा एक संस्कार खुप लहानपणीच झाला. आजही माझ्या खोलीत कपड्यांना एक तर पुस्तकांना दोन कपाटं आहेत, पण दिवाळी अंकांची परंपरा कधितरी तुटली, नक्की कधी ते आठवत नाही. शेवटचा दिवाळी अंक बहुदा दहावीत किंवा अकरावीत घेतला असेल.. त्यानंतर इंटरनेट, मोबाईल, किंडल यातूनच काय ते वाचन होऊ लागलं.. काळ बदलला, दिवाळी अंकांची भाषाही बदलली. जगा बरोबर धावणार्या विचारांना दिवाळी अंकातील मजकूर कालबाह्य वाटू लागला.. तरिही दिवाळी आली की काहितरी चुकल्या सारख आजही वाटतं.. कदाचीत बुकडेपो कडे पावलं वळवली तर सापडेल का काय सुटत चाललय ते?